नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा करताना काही कार्यक्रमांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जातो, त्याचे दर दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव आहे. स्थायी समितीने पाणीपुरवठ्यातील वाढ फेटाळली असली, तरी आता थेट महासभेवर हा प्रस्ताव मांडण्याच्या हालचाली सुरू आहेत.महापालिकेच्या वतीने शहरात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तथापि, काहीही तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तर अशावेळी नगरसेवकांच्या सूचनेनुसार, तर कित्येकवेळा नागरिकांच्या तक्रारीनुसार टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी दर आकारला जात नाही. मात्र अन्य अनेक कार्यक्रमांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कुठे सार्वजनिक कार्यक्रम असेल, तर त्यासाठी महापालिकेचे टॅँकर मागितले जातात. कित्येकदा लग्न सोहळ्यासाठीही महापालिका टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करते. त्याच्या दरात वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्यानुसार एक हजार लिटर्स पाण्यासाठी सध्या १०० रुपयांवरून दोनशे रुपये, तर चार हजार लिटर्स पाण्यासाठी २७५ रुपये प्रती खेप यावरून ४५० रुपये याप्रमाणे वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय बांधकाम अन्य व्यवसाय आणि कार्यक्रमासाठीदेखील टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, त्याचेही दर वाढविण्याचा प्रस्ताव आहे.महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर केले. त्यावेळी दरवाढीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आला. महापालिकेने पाणीपट्टीत ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा झाल्यानंतर समितीने तो प्रत्यक्ष चर्चेलाही न घेता तो तातडीने फेटाळला. त्यामुळे टॅँकरच्या दरातील वाढ फेटाळली गेली. तथापि, आता हे सर्वच प्रस्ताव पुन्हा महासभेत मांडण्याच्या हालचाली सुरू असून, त्यामुळे हा विषय महासभेत चर्चिला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
टॅँकरने पाणीपुरवठा दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: March 15, 2015 00:35 IST