लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या विद्यमान विश्वस्त मंडळाची पाच वर्षांची मुदत १५ मार्चलाच संपली असून, नूतन विश्वस्त मंडळ नियुक्तीची प्रक्रिया धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ७ डिसेंबर २०२० पूर्वीच व्हावी, असा दंडक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने श्री निवृत्तिनाथ समाधी संस्थान न्यासला घातला आहे.
संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विद्यमान विश्वस्त मंडळाची मुदत १५ मार्च २०२० रोजीच संपली आहे. तथापि, देशात लाॅकडाऊनच्या काळात मंदिरही बंद होते. त्यामुळे या नियुक्त्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यमान विश्वस्त मंडळच कारभार पाहत होते. त्यात मंदिर जीर्णोद्धाराचे काम येत्या अडीच-तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे कंत्राटदार श्रीहरी तिडके यांनी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे संत निवृत्तिनाथ यात्रेपूर्वी मंदिरावर कळस चढेल अशी शक्यता दिसत नाही. येत्या फेब्रुवारी महिन्यात संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा आहे. कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर यात्रेला परवानगी मिळेल काय, याबाबत साशंकता आहे. तथापि, नूतन विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या होऊन जातील. आतापर्यंत विद्यमान विश्वस्त मंडळाने चांदीचा एक करोड रुपयांचा कळस बांधत शासनाकडून भक्तनिवासाचे काम पूर्ण करून लोकार्पण केले आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात करण्यात आले आहे. आता कळस मात्र नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या कारकिर्दीत होण्याची शक्यता आहे.