नाशिक : दिवाळीचा हंगाम सुरू होताच शहरातील सर्वच खासगी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना ‘भाव’ आला आहे. शहरातून पुणे, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये जाणारे नागरिक अधिक असल्याने या दोन्ही ठिकाणच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. महामंडळाच्या तुलनेत दर अधिक असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.दोन दिवसांपूर्वीच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी हंगामाची भाडेवाढ जाहीर केली. सदर भाडेवाढ जाहीर होताच महामंडळावर चौफेर टीका होऊ लागली, तसेच प्रवाशांमध्येही नाराजीचा सूर उमटला. जुन्या दराच्या तुलनेत महामंडळाने सर्वसाधारण जलदच्या दरामध्ये वीस रुपये, तर निमआरामच्या दरात तीस रुपये आणि रातराणीच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. सर्वसाधारण जलदचे दर नाशिक-मुंबईचे २१५ रुपये प्रत्येकी व निमआराम गाडीचे ३०२ आणि रातराणीचे २५४ रुपये प्रत्येकी दर आहे. या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सचे दर मात्र अधिक असून, धनत्रयोदशीपासून अधिक दरवाढ होणार असल्याची शक्यता आहे. नाशिक-मुंबई खासगी प्रवास विना वातानुकूलित ३५० ते ४५० रुपये प्रत्येकी असे दर आहेत, तर वातानुकूलित गाडीचे ६५० ते ७५० रुपयांपर्यंत दर असा खासगी प्रवासाचा ‘बाजार’ शहरात तेजीत आला आहे.सद्यस्थितीत जरी सर्वसाधारण विना वातानुकूलित गाडीचे दर ३५० ते ४५० च्या मध्ये असले तरी दोन दिवसांनंतर या दरांमध्येदेखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच खासगी बसेसच्या भाडेवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अवाच्या सवा दराने भाडेवाढ खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच आगाऊ तिकीट नोंदणीदेखील काही वाहतुकदारांनी थांबविली असून, ज्या दिवशी प्रवास करावयाचा आहे त्याच दिवशी एखादी वेळ निश्चित करून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच काही खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून सुरुवातीला चौकशीमध्ये विना वातानुकूलित, वातानुकूलित बसेसचे पुणे-मुंबईचे दर वाढवून सांगितले जातात. (प्रतिनिधी)
पुणे-मुंबईचा खासगी प्रवास महागला
By admin | Updated: November 7, 2015 23:39 IST