किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्पसध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू असून, टपाल खात्यातील सेवेला खासगी कुरिअर्स सेवाचा फटका बसत आहे. कुरिअर्स सेवेला सामोरे जाऊन टपाल खात्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. दररोज सरासरी पाच हजारांहून अधिक पत्रांचे वाटप टपाल खात्यातून होत असल्याने खासगी सेवेचे आव्हान पोस्टासमोर आहे.शहर परिसराचा व्याप मोठा आहे. मालेगावची लोकसंख्या दहा लाखांवर पोहचली आहे. वाढलेला परिसर, वस्त्यांचे जाळे यामुळे टपाल खात्यास प्रत्येकाचे पत्र संबंधितांपर्यंत पोहचवणे आव्हान आहे. खासगी कुरिअर्स सेवेला नागरिकांनी पसंती दिली आहे. शहरात टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयासह नवापूर वॉर्ड, शहर टपाल खाते (रॉयल गल्लीमधील) संगमेश्वर, मार्केट यार्ड कार्यालयातील पोस्टमास्तर यांच्यासह कॅम्प टपाल कार्यालयातील सहा कर्मचारी असे एकूण २७ पोस्टमास्तर टपाल पत्रे वितरण करण्याची कामे करीत आहेत.विविध राज्ये, जिल्हे व गावांतून दररोज साडेपाच ते सहा हजार पत्रे मालेगावी वाटपासाठी येतात. ही पत्रे कर्मचारी रोज किरकोळ अपवाद वळगता शहरातील संबंधितांच्या पत्त्यांवर वेळेत पोहचवतात. या पत्रांमध्ये टपाल खाते कार्यालय विशेषत: सरकारी पत्रे, विमा कंपनी, दूरध्वनी बिले, दैनिक, साप्ताहिके, मासिक, वृत्तपत्र, लग्नपत्रिका आदिंचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो. पोस्ट कार्ड व आंतरदेशीय पत्रही किरकोळ प्रमाणात येतात. सध्या आॅनलाइन खरेदी मालाचे वितरण काही प्रमाणात पोस्ट खात्यातून होत आहे, तर टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट, नोंदणी पत्रव्यवहार (रजिस्ट्रेशन), पार्सल सेवासह इतर आर्थिक गुंतवणूक सेवा सुरू असल्याने कार्यालयात गर्दी दिसून येते. या उलट शहरात खासगी टपाल सेवा देणारे कुरिअर्सची सात ते आठ केंद्र आहेत. त्यांच्यामार्फत शहरात विविध ठिकाणी ८०० ते ९०० पत्रे, टपालांचे वितरण होते. त्यामुळे टपाल खात्यावर नागरिकांची विश्वासार्हता टिकून असल्याचे दिसते. परंतु टपाल खात्यापेक्षा जादा जलद सेवा देत असल्याचा दावा कुरिअरवाले करतात. देशभरातील महत्त्वाच्या व मोठ्या शहरात ४८ ते ७२ तासात टपाल व इतर पार्सल पोहचवण्याचे काम कुरिअर्सवाले करतात. त्यामुळे काही प्रमाणात नागरिक या सेवेकडे आकर्षित झाले आहेत. टपाल खात्यापेक्षा कुरिअर सेवा महागडी आहे. येथील पत्र, टपाल पोहच करण्यासाठी अगदी २० रुपयांपासून पुढे टपालनुसार पैसे मोजावे लागतात, तर टपाल कार्यालयात अगदी पाच रुपयांच्या तिकिटांवर पत्र देशभरात कुठेही पोहचू शकते; कुरिअर केंद्रात पोस्ट खात्याप्रमाणे इतर व्यवहारांच्या सुविधा नाही. त्यामुळे टपाल खात्याचे महत्त्व आजही टिकून असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.
खासगी ‘कुरिअर्स’चा पोस्टाला ताप
By admin | Updated: January 31, 2016 22:00 IST