नाशिक : महापालिका महासभेने १९३ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर बांधकाम विभागाकडून पहिल्या टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांची कामे केली जाणार असून, नव्याने विकसित झालेल्या बाह्य भागातील कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या खडीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. सदर कामांची निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली. दि. ७ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत सदस्यांना प्रभागातील रस्ते विकासाचे गाजर दाखवितानाच केंद्र सरकारचे अमृत व स्मार्ट सिटी अभियान आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत सुमारे २०३१ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळविण्याचा महापालिका प्रशासनाचा ‘डबलगेम’ महासभेत सदस्यांनी एकमताने उधळून लावला होता. त्यावेळी केवळ १९१.४३ कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्ती व विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे कारण दाखवत प्रशासनाकडून रस्ते विकासाच्या कामाबाबत विलंब लावला जात होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घालत महापौरांना रस्त्यांच्या कामांना गती देण्याची सूचना केली होती. त्यानुसार, प्रशासनाने आता पहिल्या टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांची कामे काढली असून, पहिल्या टप्प्यात ज्या कॉलनी परिसरात रस्त्यांच्या खडीकरणाची नितांत आवश्यकता आहे, तेथील कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर परिसरातील पंचवटी, सिडको, सातपूर, इंदिरानगर, पाथर्डी आदि भागांतही रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यांच्या खडीकरणाला प्राधान्य
By admin | Updated: January 24, 2016 22:48 IST