या बैठकीत ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली. तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता अजूनही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. त्यासाठी अधिकाधिक लस उपलब्ध करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरविण्यात याव्यात. त्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा आग्रह धरण्याचे ठरविण्यात आले. नवीन रुग्णवाहिका ग्रामीण भागातील व त्यातही दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांना प्राधान्याने पुरविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. हिरामण खोसकर यांनी पीकविमा योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. भात पिकासाठी पीक विम्याच्या अटी शेतकऱ्यांसाठी जाचक असल्याचे सांगून फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच याचा लाभ होत असल्याचे सांगितले.
चौकट===
वीज कंपनीला ऑनलाइन सूचना
दरम्यान, शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर चर्चा होत असताना बैठकीस वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित नसल्याची बाब लक्षात येताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली व शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘आस्ते कदम’ भूमिका घेण्याची सूचना केली.