नाशिक : मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत चालढकल करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत गुरुवारपासून (दि़ २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तसेच उपोषणात सहभागी न होणाऱ्या आमदारांच्या घरांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप यांनी बुधवारी (दि़ २५) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़ जिल्हा बंद आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा करून किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पाडल्याबाबत सदस्यांचे आभार मानले़ गायकर यांनी सांगितले की, मराठा समाजातर्फे बंद स्थगित करण्यात आला असला तरी आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे़ त्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे़ आंदोलनात सहभागी न झालेल्या आमदार, खासदारांचा निषेध असून, ते बेमुदत उपोषणात सहभागी न झाल्यास समन्वयकांसोबत चर्चा करून त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालया- समोरील उपोषणाबाबत पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उद्यानाच्या जागेत आंदोलनाची परवानगी मागितली आहे़ मराठा मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप यांनी पोलिसांनी जिल्ह्णात सुमारे २०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले़ पोलीस एकीकडे ताब्यात घेतात तर दुसरीकडे शांततेचे आवाहन करण्यास सांगतात हे दोन्ही एकावेळी शक्य नसल्याचे सांगितले़ यावेळी राजू देसले, अर्जुन खर्जुल, अमित जाधव, सोमनाथ बोराडे, सागर बोराडे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते उपस्थित होते़निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलनमराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री चर्चेसाठी बोलवितात़ मुळात त्यांच्यापर्यंत सर्व मागण्या या पोहोचल्या असून, सकल मराठा समाजाला नेतृत्व नाही़ त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा तो आम्हाला मान्य असेल़ मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी मोठे आंदोलन केले जाईल़
आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:01 IST