चांदवड : येथील श्री रेणुकामातेचा चैत्र यात्रोत्सवास शुक्रवार (दि.२२) पासून प्रारंभ होत असून, यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. यात्रोत्सवात पहाटे ६ वाजता देवीच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात येणार आहे. पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकचे नितीन चांदवडकर, मनमाडचे जगन्नाथ सांगळे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. यात्रोत्सवानिमित्त मिठाई, खेळणी, नारळ, प्रसाद यांच्या दुकानांनी परिसर फुलला असून, मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. अनेक भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याचा भाविक नवस करतात. याची दखल घेत संस्थानकडून नारळ फोडण्याचे मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. रेणुका देवी संस्थानने मंदिर परिसरात अनेक सुधारणा केल्या असून, आता यात्रास्थळ विकास निधीतून भक्तनिवास, हॉल, स्त्रियांसाठी प्रसाधनगृह, वृध्द व अपंग भाविकांसाठी विश्रामगृह, नवरात्रात व गर्दीच्या वेळेस भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून शिर्डीच्या धरतीवर स्टीलचे बॅरेकेडिंग बसविण्यात आले आहे. शिरीष कोतवाल यांच्या निधीतून सौरऊर्जा पथदीप, वाहनतळ, संरक्षण भिंत आदि कामे पूर्ण झाली आहे. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार, तान्हाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, विजय जोशी, हरिभाऊ कासव, काळू पवार परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
चैत्र पौणिमेनिमित्त यात्रोत्सवाची तयारी
By admin | Updated: April 16, 2016 23:06 IST