चांदवड : दर्शनासाठी मंदिरातील दरवाजांचे आकारमान वाढविलेचांदवड : येथील कुलस्वामिनी रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवास शनिवारपासून (दि. १) प्रारंभ होत असून, उत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. येथील श्री रेणुकामाता मंदिर परिसरात पुरातत्व विभाग व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू असून, बरीच कामे प्रगतिपथावर आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामे थांबविली असली तरी देवी मंदिरातील दर्शनासाठी दरवाजे मोठे करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल, उपनगराध्यक्ष कविता उगले व संदीप उगले यांच्या हस्ते घटस्थापना होईल. रात्री चांदवडचे न्यायमूर्ती के. जी. चौधरी, न्या. एस. एम. धपाटे यांच्या हस्ते सपत्नीक आरती होईल. अष्टमी व नवमीला होमहवन, तर दररोज पहाटे ५ वाजता महाभिषेक, पालखी मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिर परिसरात व्यवस्थापक एम. के. पवार व सुभाष पवार यांनी भाविकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सुधारणा करून पिण्याचे पाणी, विजेचे मोठे लाईट, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी निवासगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. घटी बसणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र हॉल बांधण्यात आला आहे. भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी शिर्डीच्या धर्तीवर स्टीलचे बॅरेकेटिंग (दर्शन रांग) पेव्हरब्लॉकमध्ये बसविण्यात आले आहे. येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे जिने बनविण्यात आले आहेत. नव्यानेच होळकरकालीन श्री रेणुकादेवी कुंडाची ट्रस्टमार्फत स्वच्छता करून त्यातील बऱ्याच वर्षांपासून साचलेला गाळ काढून त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आली आहे. कुंडात आता मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या कुंडाभोवताली संरक्षक जाळी करून विद्युत दिवे, मोठे प्रवेशद्वार केल्याने हे कुंड सुशोभित झाले आहे. या कुंडाभोवती बगीचा आदि कामे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नाने झाल्यास येथे पर्यटनाला वाव मिळू शकतो. यात्रोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल, पुरुष व महिला कर्मचारी कार्यरत आहेत. प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक विशेष लक्ष देऊन आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली आहे.नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, तान्हाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, नंदकुमार वैद्य, विजय जोशी, अमोल कुलकर्णी, नारायण कुमावत, खंडू अहेर, हरिभाऊ कासव, काळू पवार, किसन बल्लाळ, जगन्नाथ राऊत, संतोष देवरे, दीपक कुमावत व चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
रेणुकादेवी नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Updated: September 30, 2016 01:46 IST