नाशिकरोड : नाशिकरोड परिसरातील देवी मंदिर व सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. दांडियारासच्या आयोजनामुळे युवा वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नाशिकरोडची ग्रामदेवता असलेल्या श्री दुर्गादेवी मंदिर, सुभाषरोड सप्तशृंगीमाता मंदिर, देवळालीगाव रेणुकामाता मंदिर, जयभवानी रोड श्री भगवतीमाता मंदिर, देवीचौक टिळकपथ श्री संतोषी माता मंदिर, वास्को चौक जगताप मळा श्री सप्तशृंगी माता मंदिर, जेलरोड सायखेडा रोड येथील श्री दुर्गादेवी मंदिर आदि परिसरात देवी मंदिरांमध्ये आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी, मंडप उभारणे, विद्युत रोषणाई आदि कामांना जोरदार तयारी सुरू आहे.तसेच दत्तमंदिर रोड, देवळाली गांव, लॅमरोड, सुभाषरोड, जेलरोड, जयभवानी रोड, धोंगडे नगर, सिन्नरफाटा आदि ठिकाणच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप उभारणी, दांडिया-गरबाकरिता जागेचे सपाटीकरण, विद्युत रोषणाई आदि कामांना सुरूवात केली आहे. पूजेचे, घटांचे व डेकोरेशनचे साहित्य देखील बाजारात उपलब्ध झाले आहे. तर नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गृहिणीवर्ग साफसफाईच्या कामात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.नवरात्रीच्या काळात दांडिया-गरबामुळे युवा पिढीमध्ये उत्साह संचारला असून, त्यांनीदेखील विविध प्रकारे जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्या मंडळाकडे दांडिया-गरबा खेळणाऱ्यांची मोठी गर्दी व्हावी म्हणून मंडळाकडून आकर्षक विद्युत रोषणाई, डिजे सिस्टीम, आॅर्केस्ट्रा, बक्षिसे ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोड परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2015 00:04 IST