नाशिकरोड : छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतल्यानंतर प्रत्येक मराठी माणसात विरश्री संचारते, असे प्रतिपादन सोलापूर येथील शाहीर राजेंद्र कांबळे यांनी केले. जेलरोड शिवाजी पुतळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित पोवाडा गीत कार्यक्रमात कांबळे बोलत होते. यावेळी कांबळे यांनी आधी नमन साधू-संताला, नामदेवाला तुकारामाला, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या गुरुचरणाला या कवनाने पोवाड्याला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी बोकाळलेला यवनी सत्तेचा जुलूम पाहून जिजामातेच्या मनातील घालमेल त्यांनी सादर करून छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे हुंकार असल्याचे सांगून शंभू महाराजांचा जीवनपट पोवाड्याच्या सादरीकरणाने उलगडून दाखविला. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह विविध महापुरुषांच्या जीवनावर व शेतकरी आत्महत्त्या यावर पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळविली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला बालकल्याण सभापती वत्सला खैरे, नगरसेवक शैलेश ढगे, पवन पवार, अशोक सातभाई, हरिष भडांगे, अजित बने, शरद मोरे, संतोष पिल्ले, मिलिंद कुकडे, अजिज पठाण, सुनंदा जरांडे, माधुरी भदाणे, उषा पाटील, वैशाली पाटील, कश्मिरा बडगुजर, शकुंतला अहिरे, विजया दुधारे, मनोज सहाणे, कृष्णा घाटोळ, भाऊसाहेब शिरोळे, राजाभाऊ जाधव, विलास पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख योगेश निसाळ यांनी केले. सूत्रसंचालन दीपक भदाणे व महेंद्र जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)
संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोवाडा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 23:03 IST