लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यात कोरोना महामारीने पुन्हा झपाट्याने डोकं वर काढल्याचे दिसून येत असून, अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी परिपूर्ण तयारी करू शकत नसल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा तत्काळ पुढे ढकलण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. यासंदर्भात छात्र भारतीतर्फे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन परीक्षा पुढे ढकलण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन सरकार त्यांना अधिक अडचणीत आणू शकत नाही, अशी तीव्र भावना छात्रभारतीतर्फे निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात कोरोनाचे दर दिवशी १० हजार रुग्ण सापडत होते, तेव्हा द्वितीय, तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्याच स्तरावर सध्या महाराष्ट्रात दर दिवशी ५० हजारांच्या आसपास रुग्ण सापडत असताना परीक्षा पुढे ढकलणे हा एकमेव पर्याय असल्याचेही छात्रभारतीने नमूद केले आहे. अशा परिस्थतीत परीक्षा घेतल्या तर महाराष्ट्रातील सुमारे ५००० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त करतानाच सध्या विद्यार्थी वसतिगृह तसेच कोरोनाबाधित विद्यार्थी विषाणूच्या प्रसारास आणखी कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त करतानाच, परीक्षा घेतल्या तर हा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त करीत छात्रभारतीने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जन माहिती अधिकारी महेंद्र कोठावदे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी छात्रभारतीचे राज्य संघटक समाधान बागुल, शहराध्यक्ष सदाशिव गणगे, उपाध्यक्ष देविदास हजारे, आरोग्य विद्यापीठाचे विद्यार्थी ओमकार कुंभार्डे, रूपेश नाठे उपस्थित होते.