नाशिक : चलनी नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी पाहता, रविवारीही जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय पोस्ट अधीक्षकांनी जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे बीएसएनएलची २८ ग्राहककेंदे्र रविवारी व सोमवारी सुरू राहणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ९७ पोस्ट कार्यालयांमध्ये नागरिकांना चलनी नोटा बदलून देण्याबरोबरच, हजार व पाचशेच्या नोटा भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी बॅँकांबरोबरच पोस्ट कार्यालयालाही पसंती देत कोट्यवधी रुपये डिपॉझिट केले आहेत. नागरिकांचा प्रतिसाद पाहता रविवारी (दि. १३) दिवसभर सर्व पोस्ट कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.दरम्यान, बीएसएनएलच्या २८ ग्राहक सेवा केंद्रात रविवारी बीले स्वीकारली जाणार आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा ग्राहकांना या बिलाच्या माध्यमातून देता याव्यात यासाठी ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती बीएसएनएलचे महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती यांनी दिली. सोमवारी (दि. १४) गुरुनानक जयंतीनिमित्ताने शासकीय सुटी असलीतरी बीएसएनएलची ही २८ केंद्रे बील भरणा करण्यासाठी सुरुच राहणार आहेत. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रजापती यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पोस्ट व दूरध्वनी कार्यालये आजही राहणार सुरू
By admin | Updated: November 13, 2016 00:18 IST