नांदगाव : दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचे प्रत्यंतर भौरी येथील शेतकऱ्यांना येत असून, खोल गेलेल्या विहिरीतल्या पाण्यापासून जनावरे व माणसे वंचित झाली आहेत. पोल पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नांदगाव-येवला रस्त्यालगत भौरी गावच्या हनुमाननगर गट नं. ५२ मधील विजेचा पोल काही महिन्यांपूर्वी पडला आहे. बाणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप दखल घेतली नाही व पोल उभारला गेला नाही. तालुक्यातल्या भीषण टंचाईग्रस्त भागात भौरीचा समावेश होतो. गावात पाणी नाही म्हणून मागणीवरून टँकर सुरू करण्यात आला आहे. मात्र टँकरच्या फेऱ्या अनियमित असल्याने छायाचित्रात दाखविलेल्या विहिरीतले अल्प पाणी ग्रामस्थांना आधार आहे. बादल्यांनी पाणी शेंदून काढले जाते व जनावरे व माणसांची तहान भागवली जाते. येथील गायी, म्हशी व बैल यांना पाणी सदर विहिरीवरून पाजण्यात येते. दुसरा पाणीस्त्रोत लांब असल्याने जनावरे व माणसे या दोघांची पंचाईत झाली आहे. पण वीज वितरण कंपनीच्या संवेदनाहीन अधिकाऱ्यांना याची जाणीव नसल्याने गावातील जनतेचे हाल होत आहेत, अशी माहिती संभाजी गायकवाड यांनी दिली. (वार्ताहर)