नाशिक : महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश येऊन धडकले आणि राजकारण तापण्यास सुरुवात झाली. आयुक्तांच्या बदलीचे निमित्त साधत सत्ताधारी मनसेसह शिवसेना आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीही भाजपावर तुटून पडली. भाकपा-आम आदमी पार्टीसारख्या छोट्या पक्षांनीही रस्त्यांवर येत निषेध नोंदविला, तर मनसेने स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा कार्यक्रम घोषित केला. दरम्यान, भाजपाने आयुक्तांच्या कारकीर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करत प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून शासनाने बदली केली असावी, असा युक्तिवाद केला. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणेच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेतले. परंतु विकासकामांच्या ढिलाईबाबत लोकप्रतिनिधींचाही रोष ओढवून घेतला. त्यामुळे महासभांमध्ये बऱ्याचदा आयुक्तांवर अप्रत्यक्षपणे शाद्बिक हल्ले करण्याची संधी नगरसेवक साधत आले. त्यात सोयीसोयीनुसार सर्वपक्षीय सामील होत राहिले. आधी सिंहस्थ नंतर ‘स्मार्ट सिटी’तच आयुक्त गुंतून राहिल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल प्रशासनाला नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भाजपा पदाधिकाऱ्यांसह आमदारांशीही आयुक्तांचे खटके उडाल्याच्या चर्चेनंतर त्यांच्या बदलीची चर्चा वारंवार होत राहिली. या बदलीवरून दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत सेना-मनसेसह विरोधकांनी भाजपा सदस्यांची कोंडी केली होती. गुरुवारी रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांकडे शिरखुर्म्याची मेजवानी सुरू असतानाच दुपारी डॉ. गेडाम यांच्या बदलीची वार्ता येऊन धडकली आणि बदलीवरून राजकारण तापायला सुरुवात झाली. गेडामांच्या बदलीचे निमित्त करत सेना-मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपावर खापर फोडले. शहराच्या विकासकामांना खीळ बसावी यासाठीच आयुक्तांची बदली केली गेल्याचा आरोप करण्यात आला.
आयुक्तांच्या बदलीने तापले राजकारण
By admin | Updated: July 8, 2016 00:26 IST