शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

दिवाळीपूर्वीच फुटताहेत राजकीय फटाके

By admin | Updated: October 16, 2016 02:51 IST

दिवाळीपूर्वीच फुटताहेत राजकीय फटाके

 किरण अग्रवाल

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आरक्षित ‘खाटां’ची निश्चिती झाल्याने राजकीय ‘वाटा’ सुरक्षित करू पाहणाऱ्यांनी पक्षांतरे चालविली आहेत; अर्थात आरक्षणे घोषित होण्यापूर्वीही काही पक्षांतरे घडून आली आहेत. पण ही भरतीच त्या त्या पक्षांसाठी डोकेदुखीची ठरणार आहे. कारण नव्या समीकरणात व महापालिकेच्या घटलेल्या प्रभाग संख्येत पक्षांतर्गतच स्पर्धा मोठी आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गटा-गणांसह महापालिका प्रभागातील आरक्षणाच्या घोषणेमुळे तिकिटेच्छुक आपल्या राजकीय वाटा निश्चित करण्यात गुंतले असून, त्याच अनुषंगाने दिवाळीपूर्वीच पक्षांतराचे राजकीय फटाके फुटू लागले आहेत; पण मुळात मर्यादित असलेल्या जागांसाठी स्वकीयांसोबतच बाहेरून आलेल्यांचीही भाऊगर्दी झाल्याने आता पक्ष नेत्यांचीच कसोटी लागणे स्वाभाविक ठरणार आहे.राजकारणात निवडणुका म्हटल्या की, दिवाळीसारखाच चैतन्याचा माहोल अनुभवयास येतो. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षणांच्या सोडती जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांनी आपापल्या सोयीचा तसेच पक्ष पातळीवर कुणाकडे उणीव आहे, याचा काहीसा अंदाज बांधत राजकीय घरोबे बदलणे सुरू केल्याने नाशिक जिल्ह्यातही आतापासूनच उत्साहाचे तसेच उत्सुकतेचे वातावरण निर्माण होऊन गेले आहे. राजकीय परिघावर आतापासूनच दिवाळी साजरी होऊ लागल्याचे यातून दिसून येत आहे. अर्थात, आरक्षणाच्या सोडतीपूर्वीही भाजपा-शिवसेनेत नवीन ‘भरती’ची लाट होतीच, पण त्यामागे या पक्षांना येऊ शकणाऱ्या ‘अच्छे दिना’ची संभावना होती. आता जी पक्षांतरे घडून येत आहेत ती आरक्षणातून ओढवलेल्या विस्थापनाच्या धास्तीतून. विशेषत: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गटा-गणांत अनेक विद्यमान सदस्यांना आरक्षणाचा फटका बसल्याने सुरक्षित नवीन जागा व त्यादृष्टीने नव्या पक्षाचा शोध त्यांनी सुरू केला आहे. माजी आमदार व भाजपाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख काशीनाथ मेंगाळ, राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांच्यासह काहींनी तर आरक्षण सोडतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील ‘मातोश्री’ गाठत हाती शिवबंधन बांधून घेतले आहे. यातील इतरांचे जाऊ द्या, पण स्वबळावर सर्व स्थानिक संस्थांत दिग्विजयाची तयारी करणाऱ्या भाजपाच्या दारात अन्य पक्षीयांची प्रवेशासाठी गर्दी झाली असताना मेंगाळ यांनी तो पक्ष सोडून स्वगृही शिवसेनेत परतावे हे विशेषच ठरावे.खरे तर मेंगाळ शिवसेनेत परतण्यापूर्वीच तेथे त्यांचे एकेकाळचे स्पर्धक माजी आमदार शिवराम झोले यांनी आसरा घेतला आहे. अशात मेंगाळ यांची तेथे भर पडल्याने कुणाला काय लाभ व तोटा संभवेल हे ते स्वत: अगर तो पक्षच जाणो. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीच्या व्यासपीठांची शोभा वाढवणारे माजी खासदार पिंगळे यांचे बंधूही शिवसेनेत आल्याने आता राष्ट्रवादीत भविष्य उरले नाही, असा सुचक संकेतच या नेत्याकडून दिला गेल्याचे म्हणता यावे. यात आणखी एक बाब आवर्जून उल्लेख करता येणारी आहे, ती म्हणजे आता आतापर्यंत छगन भुजबळ यांचे पक्षात वर्चस्व होते म्हणून आपल्याला फारशी संधी नव्हती असे म्हणणारे पिंगळे, भुजबळ त्यांच्या अडचणीमुळे काहीसे दूर असतानाही स्वत:ला स्वत:च्या पक्षात सुरक्षित समजू शकत नसतील व आपल्या बंधूला अन्य पक्षाच्या आश्रयास पाठवित असतील तर इतरांनी कोणत्या आशेने राष्ट्रवादीकडे बघावे, असा प्रश्न उपस्थित होणारच. भाजपातील काही प्रवेशही लवकरच होऊ घातले आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दौऱ्याची वाट त्यासाठी बघितली जात आहे. या प्रवेशार्थींच्या यादीत जी नावे असल्याची चर्चा आहे तीदेखील अशीच धक्कादायक म्हटली जात आहेत. म्हणजे, आपापल्या पक्षातील खुर्च्या स्वत: सांभाळणारे नेते आपल्या पुत्र वा आप्तेष्टांना मात्र भाजपात पाठविण्याच्या तयारीत आहेत. ‘दोन्ही डगरी’वर हात ठेवण्याचाच हा प्रयत्न असून, संबंधितांच्या या राजकीय व्यवसायाकडे मतदार कसा बघतो हे लवकरच दिसून येणार आहे.अर्थात, शिवसेना असो की भाजपा, या पक्षात येणाऱ्यांची जी गर्दी आहे ती तिकिटासाठीच आहे हे उघड आहे. या गर्दीत निव्वळ पक्ष कार्यासाठी आलेले कुणी नाही. त्यामुळे उद्या तिकीट न मिळाल्यास यातील बहुसंख्य लोक पुन्हा तिसरीकडे संधीचा शोध घेतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तेव्हा, पक्षाला कसे अनुकूल वातावरण आहे हे दाखविण्यासाठी आज येईल त्या प्रत्येकाला प्रवेश देताना त्यातून ऐनवेळी कोणते वा कसे फटाके फुटतील, हेच या पक्षांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. कारण नवोदितांची भरती केल्याने पक्षातील मूळ निष्ठावंत म्हणवणाऱ्यांची व ज्यांना आपली उमेदवारी हिरावली जाण्याची भीती सतावते आहे त्यांची चलबिचल झाली असून, ही पक्षांतर्गत धुसफूस लपून राहिलेली नाही. ही पक्षांतर्गत धुसफूस समोर दिसणारा विजयही कसा पराजयात परावर्तित करू शकते हे शिवसेनेने अनुभवून झाले आहे. दशरथ पाटील लोकसभेची निवडणूक शिवसेनेतर्फे लढले होते तेव्हा केवळ पक्षांतर्गत विरोध व नाराजीतून त्यांना घरी बसण्याची व नंतर पक्षास जय महाराष्ट्र करण्याची वेळ आली होती. परिणामी आता दारात गर्दी असली तरी जेथे उमेदवाराची वानवा आहे, तिथल्याच इच्छुकांना घरात घेण्याची भूमिका संबंधित पक्षांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मर्यादित मतदारसंघात अनुकूलतेऐवजी प्रतिकूलतेचे वारे प्रवाहित होणे अवघड नसते. उमेदवारी टाळली गेल्याने अथवा विश्वासात न घेतल्याने दुखावणारी स्वकीयांची मने काही केल्या सांभाळली गेली नाही तर ऐनवेळी अडचणी समोर आल्याखेरीज राहणार नाहीत. तिकिटेच्छुकांची वाढलेली गर्दी लक्षात घेता शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांना याच आघाडीवर जुन्यांना सांभाळून व नवोदितांना योग्य ती संधी देऊन खिंड लढवावी लागणार आहे व तेच खरे आव्हानाचे आहे.नाशिक महापालिकेसाठीच्या प्रभागांची व्याप्ती वाढून चार वॉर्डांचा एक मतदारसंघ झाल्याने अनेक मातब्बर एकमेकांसमोर येऊ घातले आहेत. हे मातब्बर एका पक्षातील तर असतीलच व पक्षाच्या तिकिटासाठी ते झुंजतीलच, परंतु तिकिटानंतरही स्पर्धकांशी लढताना त्यांना मातब्बराशीच सामना करावा लागेल असे काही प्रभाग झाले आहेत. प्रभागाच्या भौगोलिक सीमांनी भिन्न पक्षीय भाई-दादांना एकमेकांसमोर आणून उभे केले आहे. त्यामुळे जागेची मर्यादा व एका पक्षात एकापेक्षा अधिक असलेल्या तिकिटेच्छुकांची संख्या लक्षात घेता अडचणीतील पक्षांचीही ‘दिवाळी’ साजरी होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. पक्षांतराच्या प्रकारात सर्वात मोठा फटका ‘मनसे’ला बसला आहे. या पक्षाचे एका डझनापेक्षा अधिक नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. जे पक्षात आहेत मग ते लोकप्रतिनिधी असोत की पक्ष पदाधिकारी, त्यांच्या बळावर जि.प., पं.स. वा महानगरपालिका लढायची तर काही खरे नाही असेच म्हणण्यासारखी स्थिती आहे. परंतु आरक्षणामुळे आलेल्या मर्यादा व शिवसेना-भाजपातील तिकिटासाठी होऊ घातलेली चुरस पाहता ‘मनसे’सह काँग्रेसला व अगदी रिपाइं वा ‘बसपा’सारख्या पक्षांनाही किमान उमेदवार देण्याच्या पातळीवर तरी ‘अच्छे दिन’ आल्यास आश्चर्य वाटू नये. पण पुन्हा अशा स्थितीत अधिक लाभ संभवेल तो ‘मनसे’लाच. कारण उमेदवारीसाठी तशा सर्वाधिक रिक्त जागा त्याच पक्षाकडे दिसत आहेत. काँग्रेसकडेही त्याचे प्रमाण बरोबरीत आहे, पण अन्य पक्ष स्वकीयांची नाराजी ओढवून घेऊनही भरतीप्रक्रिया राबवत असताना काँग्रेसचे नेते मात्र पक्षातील निष्क्रियांसाठी ‘चले जाव’चा नारा देत आहेत. निवडणुकीच्या गलबतावर सक्रिय व निष्क्रिय अशा साऱ्यांचीच गरज भासत असते. निष्क्रिय असले तरी त्यांना दुखवायचे नसते कारण ते पक्षकार्याला येणार नसले तरी त्यांची मते मात्र पक्षालाच पडणारी असतात. पण तसा विचार न करता इशारे दिले जात आहेत व पक्ष सोडून जाऊ इच्छिणाऱ्याला न थोपवता पर्यायी व्यवस्थेचे सल्ले दिले जात आहेत. याचा अर्थ आहे त्यांच्या भरोशावर किंवा बळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची काँग्रेसची तयारी आहे. राष्ट्रवादीने नुकतीच शहर अध्यक्षपदावरील खांदेपालट केली आहे. तूर्त तरी गटबाजीचा शिक्का नसणारे हे नवे नेतृत्व यापुढील काळात पक्षाला कसे पुढे नेते याची खुद्द या पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांनाही उत्सुकता लागून आहे. या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी मात्र सर्वात अगोदर जागे होत व संपूर्ण जिल्ह्यात गटवार मेळावे घेत पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह भरून ठेवला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी मिळून धडपड केली तर राष्ट्रवादीही चांगल्या स्थितीत राहू शकेल. तेव्हा, या एकूणच पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वीच जे राजकीय फटाके फुटू लागले आहेत, त्यांचा आवाज आणि धूर कसा व किती निघतो हेच औत्सुक्याचे आहे.