नाशिक : महिलांची छेडछाड प्रकरणाच्या तपासासाठी संत कबीरनगर झोपडपट्टीत गेलेल्या पोलिसांना दमबाजी व मारहाण झाल्याची घटना बुधवारी (दि. २२) घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी गंगापूर पोलीस ठाण्यात महेश भारत कटारिया याच्यासह त्याचे मित्र व आई, बहीण व पत्नी यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, नाशिकरोड येथील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या गोंधळाच्या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलिसांवर हात उचलण्याची घटना समोर आल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सागर जगन्नाथ गुंजाळ (२९) यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. गुंजाळ त्यांच्या पथकासह अटकेतील आरोपी अजय घुले याच्या सांगण्यावरून संशयित महेश कटारिया यास सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ६९-२०२१ मधील तपासासाठी विचारपूस केली. यावेळी संशयित महेश कटारिया यांनी जोरजोरात आरडाओरडा करून तसेच त्यांची आई, बहीण व मित्रांना रॉकेलची कॅन घेऊन बोलावले, यावेळी एक महिला डिझेलची कॅन घेऊन आली. हे डिझेल आरोपीने अंगावर ओतून घेतले. पोलीस पथकाने डिझेलची कॅन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फिर्यादी सागर गुंजाळ व पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत हाताच्या चापटीने मारहाण करून तुम्हाला कामाला लावतो, असा दम दिला. त्यामुळे पोलीस हवालदार सागर गुंजाळ यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित महेश कटारिया विरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.