नाशिक : चांदशी शिवारात सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि़१) रात्री छापा टाकला़ या हॉटेलमधून हुक्का ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, हुक्क्याचे विविध फ्लेवर्स असा ७ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हॉटेल व्यवस्थापक प्रवीण रंगनाथ दराडे (३२, रा. हिरावाडी, पंचवटी) व हुक्का ओढणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चांदशी शिवारातील हॉटेल शॅकमध्ये युवक-युवतींसाठी मद्यपान तसेचधूम्रपानासाठी स्वतंत्र व्यवस्था असून, या ठिकाणी सर्रास मद्यपान तसेच धूम्रपानासाठी हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, जालिंदर खराटे, लहू भावनाथ, इम्रान पटेल यांनी रविवारी (दि.१) रात्री हॉटेल शॅकवर छापा टाकला. हॉटेलमधील लॉन्स तसेच झोपड्यांमध्ये सर्रास हुक्का ओढला जात असल्याचे तसेच हॉटेल व्यवस्थापक संशयित प्रवीण दराडे हे सार्वजनिक जेवणाच्या ठिकाणी विविध फ्लेवरचा हुक्का उपलब्ध करून देत असल्याचे दिसले़ पोलिसांनी हॉटेलमधून हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, हुक्क्याचे विविध फ्लेवर्स असा ७ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़विशेष म्हणजे या ठिकाणी वाढलेला युवक-युवतींचा वावर, मद्यपान, धूम्रपान यामुळे हा प्रकार बंद करण्याची मागणी केली जात होती़हॉटेलमध्ये युवक-युवती सर्रास धूम्र्रपान व मद्यपान करत असल्याच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे़ संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी अवैध हुक्का पार्लरबाबत बिनदिक्कतपणे पोलिसांना माहिती द्यावी़- संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
चांदशी शिवारात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:25 IST