नाशिक : रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पेशंटच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ यामुळे राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपाचे हत्यारही उपसले होते़ यानंतर सरकारने संरक्षण देण्याची मागणी मान्य केली आहे़ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शनिवारपासून आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ नाशिक जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच संगमनेर येथील स्वाइन फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी डॉक्टर व परिचारिकेस मारहाण केली होती़ जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन चर्चा केली होती़जिल्हा शासकीय रुग्णालयात आठ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यामध्ये दोन बंदूकधारी आहेत़ याबरोबरच परिसरात गस्त घालणारे बीट मार्शल दर तासाने रुग्णालयात येऊन सुरक्षेचा आढावा घेणार आहेत़ या बीट मार्शला जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या रजिस्टरवर नोंदही करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)