पंचवटी : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालून पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याने संशयितांच्या शोधार्थ नाकाबंदी सुरू केली आहे. मात्र नाकाबंदीनंतरही शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत शहरात पाच ते सहा ठिकाणी सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने शहरात सर्वत्र नाकाबंदी सुरू केली. मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले. शहरात सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी तसेच रोकड लुटून नेण्याचे प्रकार घडले असले, तरी पोलीस अद्यापही संशयितांपर्यंत पोहचू न शकल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकाला व खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांना मरगळ आल्यानेच चोरट्यांना मोकळे रान मिळाले असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे. शहरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे आणि पोलीस प्रशासनाकडून केवळ बघ्याचीच भूमिका घेतली जात असल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे; मात्र पोलिसांमधील मरगळ हटत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
नाकाबंदीनंतरही चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी
By admin | Updated: July 19, 2014 01:05 IST