हनुमानवाडी : पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक सातमधील मोरेमळा चौफुलीवर पोलीस चौकी व्हावी, या मागणीसाठी शिवकल्याण कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार देवयानी फरांदे यांना निवेदन दिले आहे.हनुमानवाडीतील प्रभाग क्रमांक सातमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी व चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. परिसरात अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये वाढ होत असून, गुन्हेगारांवर आळा बसण्यासाठी परिसरात जवळच पोलीस चौकी होणे गरजेचे आहे. परिसरात घरफोड्या, चोऱ्या, चेन स्नॅचिंग, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याने अशा वेळेस तत्काळ कारवाई करण्यासाठी पंचवटी पोलीस स्टेशन व मालेगाव स्टॅण्ड पोलीस स्टेशनवर परिसरातील नागरिकांना धावपळ करावी लागते. नागरिकांची धावपळ टाळण्यासाठी परिणामी परिसरातच एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे मोरेमळा चौफुलीवर एक छोटीशी पोलीस चौकी उभारण्यात यावी, यासंबंधी फरांदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोळेकर, मार्गदर्शक रवींद्र आखाडे, अॅड. अमोल घुगे, प्रताप कोळेकर, शिवाजी पाटील आदि उपस्थित होते. आमदार फरांदे यांनी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून पोलीस चौकी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
मोरे मळा चौफुलीवर पोलीस चौकीची मागणी
By admin | Updated: February 6, 2016 00:40 IST