नाशिक : पंचवटीत फुलेनगर परिसरात स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पंधरा दिवसांत नवीन घंटागाड्या सुरू होतील, तोपर्यंत सहकार्य करून प्रभागात स्वच्छता राखावी आणि आरोग्यदायी वातावरणास मदत करावी, असे पंचवटीत फुलेनगर येथे शनिवारी झालेल्या वॉर्ड सभेत ठरविण्यात आले. फुलेनगर येथील लोकनिर्णय सामाजिक संस्था आणि पंचवटीतील मनपाच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले शहरी आरोग्य केंद्र येथे वॉर्ड सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. प्रभागाचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप, विभागीय स्वच्छता निरीक्षक गोसावी, स्वच्छता निरीक्षक शिंदे, मुकादम साळवे आणि लोकनिर्णयचे संतोष जाधव यावेळी उपस्थित होते. या परिसरात यापूर्वी स्वच्छतेच्या विषयावरून जनसुनवाई घेण्यात आली. त्यावेळी या भागातील नागरिकांनी परिसर कचराकुंडीमुक्त केला होता. मात्र आता महापालिकेच्या घंटागाडी तीन ते चार दिवसांआड येत असल्याने स्वच्छतेची शिस्त बिघडली आहे. नागरिकांना पर्याय नसल्याने मुख्य रस्त्यावर कचरा टाकला जातो. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. शिवाय कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेचा अपघात घडला असून, अनेक लहान मुलांचे अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित वॉर्ड सभेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत नवीन घंटागाड्या सुरू होतील. सुरुवातीला दोन ते तीन दिवसांआड घंटागाड्या येतील, नंतर मात्र त्या नियमित येतील. दोन मोठ्या आणि एक छोटी गाडी या परिसरात पाठविली जाईल तसेच सर्व सफाई कामगारांना सुविधा देण्यात येतील, असे सांगण्यात आले. दरम्यान यावेळी शंकर खोजे व देवीदास रायजादे या स्वच्छता राखणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
घंटागाड्या येईपर्यंत सहकार्य करा
By admin | Updated: September 11, 2016 01:56 IST