शासनाकडून जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीचा विनियोग कसा केला जाणार यासाठी सर्वच विभागांना आपला आराखडा तयार करावा लागतो. गेल्या वर्षी काेरोनामुळे शासकीय कामावर परिणाम झाल्यामुळे आगामी आर्थिक वर्षाचे नियोजन करण्यासही विलंब झाला होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व विभागांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे संभाव्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु नंतर लगेचच ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे सदरचे काम संथगतीने सुरू होते. आता मात्र आर्थिक वर्ष सुरू होण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने जानेवारी अखेर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या होत्या. त्यासाठी सदस्यांना त्यांच्या गटातील अत्यावश्यक कामे सुचविण्याची मुभा देण्यात आली होती. काही पदाधिकारी व सदस्यांनी आपापली कामे सुचविली असली तरी, बहुतांशी सदस्यांनी अद्यापही कामे सुचविलेली नाहीत. त्यातच गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असल्याने अधिकारी व्यस्त होते, ते आटोपताच राज्यपालांचा दौरा जाहीर झाल्यामुळे अधिकारी पुन्हा त्यात गुंतल्यामुळे आता पुढच्या आठवड्यातच नियोजन पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या खात्यांचे नियोजन लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST