नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, इसीजी व टूडी इकोसह इतर चाचण्यांचा अहवाल सामान्य आला आहे़ दरम्यान, मंगळवारी (दि़१७) मानेचा एक्स-रे काढण्यात येणार असून, त्या अहवालानंतर त्यांची पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याच्या हालचाली जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुरू केल्या आहेत़पिंगळे यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार शनिवारी (दि़१४) केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांची इसीजी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल सामान्य आला, मात्र २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते़ सोमवारी दुपारी त्यांची दुसरी इसीजी तसेच टूडी इकोची तपासणी करण्यात आली़ या दोन्ही तपासण्यांचे अहवाल सामान्य आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असून, त्यांना आजच कारागृहात हलविण्यात येणार होते़(प्रतिनिधी)
पिंगळेंची मंगळवारी कारागृहात रवानगी?
By admin | Updated: January 17, 2017 01:43 IST