पिंपळगाव बसवंत : शहरातील वाढत्या गुन्हेगारी व गुंडशाही प्रवृत्तींचा त्वरित बंदोबस्त करावा यासाठी शहरवासीयांनी संपूर्ण १०० टक्के बंद ठेवून ग्रामपंचायत व शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढला. प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चात शहरवासीय, व्यावसायिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पिंपळगाव बसवंत हे शहर व्यापाऱ्यांचे प्रमुख केंद्र झाल्याने शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच, शहरातील काही समाजकंटक याचा फायदा घेत बाजारात महिलांना, शालेय- महाविद्यालयीन मुलींना अर्वाच्च भाषा बोलणे, छेड काढणे, मोबाइल, मंगळसूत्र चोरी, बँकातील ग्राहकांच्या पैशांची चोरी, बॅगा लांबविणे असे अनेक मोठे गुन्हे दररोज घडत आहेत. पोलिसांत अनेक वेळा तक्रारी करूनही ते राजरोसपणे फिरत आहेत.अवैध धंद्यांना शहरात ऊत आल्याने नागरिकांचा उद्रेक अनावर झाला. त्यात २० मार्च रोजी रात्री सचिन देशमाने या युवकाच्या गाडीची तोडफोड केल्यामुळे संतापून नागरिकांनी मंगळवारी (दि. २२) सर्वपक्षीय मोर्चा काढला.शहरातील सर्व नेतेगण राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्रितपणे मोर्चाचे नेतृत्व सांभाळत असताना दिसून आले. ग्रामपालिकेपासून सकाळी १० वाजता निघालेला मोर्चा मेनरोड, निफाडफाटामार्गे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी पोहोचला. यावेळी गावची प्रमुख वेस येथे भगवा झेंडा फडकविण्यात आला. शिवरायांचा जयजयकार करत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा १२ वा. पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. यावेळी मान्यवरांनी घडलेला प्रकार पोलीस, प्रांताधिकारी यांना कथन केला. तसेच पिंपळगावच्या शहराची पोलीस यंत्रणा जनसामान्यांची नसून गुंडप्रवृत्तीच्या पाठीशी कशी आहे, हे दाखवून दिले. घडलेल्या प्रकाराबाबत शहरातील पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही याबद्दल संताप व्यक्त केला.यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, भाजयुमोचे अध्यक्ष बापू पाटील, सतीश मोरे, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खोडे, तानाजी बनकर, भास्कर बनकर आदिंनी भाषणाद्वारे आपला संताप व्यक्त केला.यावेळी मोर्चात दिलीप देशमाने, पंढरीनाथ देशमाने, अशोक शाह, सोहन भंडारी, प्रतापराव मोरे, दिलीप मोरे, गणेश बनकर, दीपक बनकर, सत्यजित मोरे, किरण लभडे, प्रकाश गोसावी, संजय सोनवणे, बाळासाहेब आंबेकर, प्रशांत घोडके, रामकृष्ण खोडे, विश्वास मोरे, गिरीश बनकर, दीपक शिंदे, अभिजित मोरे, देवेंद्र काजळे, उमेश जैन, रामभाऊ माळोदे, संदीप भवर, गणपतराव विधाते, महेंद्र खोडे, राजेंद्र भवर, आकाश चोपडे, मदन घुले, वैभव दौंड, दिनेश पवार, प्रदीप चौधरी, दिलीप जाधव, बाळासाहेब साठे, सिद्धार्थ बुरड, रोहित तोडकर, सुरेश लभडे, बाळासाहेब लभडे, बाळासाहेब दुसाने, योगेश संधान, संतोष खापरे, अशोक शिंदे, सुहास शिंदे, सुभाष होळकर, पंकज होळकर, अरुण चव्हाणके आदिंसह शहरातील सर्वपक्षीय मित्रमंडळ, हमाल-मापारी आदि ८ ते १० हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
गुंडगिरीच्या निषेधार्थ पिंपळगाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 23:10 IST