नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या अधिकारावर प्रशासनाकडून वारंवार होणारे अतिक्रमण आणि विकासकामांबाबत होत असलेले राजकारण आदि समस्या घेऊन स्थायी समितीचे सभापती व काही सदस्य मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असून, रात्री उशिरापर्यंत सदस्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळालेली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून स्थायी समिती व आयुक्त यांच्यात संघर्ष सुरू आहे. साधुग्राममधील स्वच्छता ठेक्याचा वाद तर न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. स्थायी समितीने मंजुरी दिलेली नसतानाही प्रशासनाकडून स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. त्यामुळे स्थायी समिती आणि आयुक्त यांच्यातील संघर्ष आता टोकाला जाऊन पोहोचला असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार असल्याचे समजते. या सदस्यांचे नेतृत्व एक स्थानिक आमदार करत असल्याचे समजते. दरम्यान, सदस्यांना रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट मिळाली नव्हती, तर पालकमंत्र्यांनी नाशिकला लवकरच बैठक बोलावून उभयपक्षात समेट घडवून आणण्याचे आश्वासन देत सदस्यांची बोळवण केल्याचे समजते. (प्रतिनिधी)
स्थायीचे सदस्य मुंबईत
By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST