नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपात रस्सीखेच सुरूच असून, मुंबईला सहा इच्छुकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर ठाण मांडले. त्यानंतरही निर्णय बुधवारी (दि.१७) होणार असून, दगा फटका टाळण्यासाठी दुपारी उमेदवाराची घोषणा केल्यानंतर एकच उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्या सभापतिपदाच्या उमेदवाराला अनुमती दिली जाणार आहे.महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची गुरुवारी (दि.१८) निवडणूक होणार आहे. समितीतील १६ पैकी ९ सदस्य भाजपाचे असून, बहुमत असल्याने त्यामुळेच भाजपातच अधिक स्पर्धा आहे. समितीच्या सदस्यपदी गणेश गिते यांची निवड झाल्यापासून त्यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत असले तरी आता अखेरच्या टप्प्यात त्यांना विरोधही तेवढाच वाढला आहे. पूर्व विभागालाच सर्व पदे दिली जात असल्याचा अन्य विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांचा आरोप असला तरी पूर्व विभागातूच कमलेश बोडके, उद्धव निमसे आणि प्रा. शरद मोरे यांनी त्यांना आव्हान दिले आहे, तर पश्चिममधून स्वाती भामरे आणि पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून पुष्पा आव्हाड आणि भाग्यश्री ठोमसे यांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. बोडके हे पक्षातील ज्येष्ठ आहेत, तर निमसे हेदेखील पंचवटीतील प्रभावी नगरसेवक असून, प्रा. शरद मोरे हे कोणत्याही गटाचा शिक्का नसलेले उच्चशिक्षित उमेदवार आहेत. त्यामुळे गिते यांना पूर्व विभागातूनदेखील उमेदवारीला आव्हान असून, यासह एकुण सहा इच्छुकांनी मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी ठाण मांडल्याचे सांगण्यात आले.पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने गिते यांचे नाव पुढे केले जात असल्याने बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळीच अधिकृत उमेदवार घोषित केला जाईल, असे पक्षाचे नियोजन आहे. ज्या उमेदवाराचे नाव घोषित केले जाईल त्यालाच अर्ज दाखल करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल करून ऐनवेळी माघार न घेता बंडखोरी करण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.सानप म्हणतात, मग काय करू?पूर्व विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांनाच महापालिकेच्या विविध समित्यांवर संधी दिली जात असल्याचा आरोप भाजपात होत असला तरी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी माझ्याच मतदारसंघात सर्वाधिक भाजपा नगरसेवक निवडून आले आहेत, मग काय करू, असा प्रश्न केला आहे. पंचवटी प्रभागात १९ नगरसेवक भाजपाचे असून नाशिकरोडचा पूर्व विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या भागातही भाजपाचे नगरसेवक आहेत. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने प्रत्येकला संधी द्यावी लागते. मी सर्वांच्या कामगिरीचा विचार करून संधी दिली अन्य माझ्या मुलाला म्हणजेच मच्छिंद्र सानप यांनादेखील एकही पद दिलेले नाही. परंतु अन्य विभागांतही सर्वांना संधी दिली आहे, असे सांगितले वर आरोप फेटाळले आहेत.
स्थायी सभापतिपदाचा आज होणार फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:25 IST
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपात रस्सीखेच सुरूच असून, मुंबईला सहा इच्छुकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर ठाण मांडले. त्यानंतरही निर्णय बुधवारी (दि.१७) होणार असून, दगा फटका टाळण्यासाठी दुपारी उमेदवाराची घोषणा केल्यानंतर एकच उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्या सभापतिपदाच्या उमेदवाराला अनुमती दिली जाणार आहे.
स्थायी सभापतिपदाचा आज होणार फैसला
ठळक मुद्देभाजपा निर्णय घेणार : एकच अर्ज दाखल होणार