विंचूर : निफाड तालुक्यातील हनुमाननगर येथे पायी घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला.
नाना महादु चव्हाण रा. हनुमाननगर (५५) हे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. हनुमाननगर येथील चव्हाण वस्तीवर राहणारे नाना चव्हाण चार वाजेच्या दरम्यान विंचूरकडून हनुमाननगर येथील चव्हाण वस्तीवर पायी घरी जात होते. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या सीटी हंड्रेड या दुचाकी (एम.एच. १५ एफ.ए.२८३५) येणाऱ्या दुचाकीस्वाराने हनुमाननगर गावाजवळ नाना चव्हाण यांना पाठीमागून धडक दिली. चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने चव्हाण हे जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार जखमी झाले. दुचाकीस्वारास उपचारासाठी विंचूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर, चव्हाण यांचा मृतदेह निफाड येथील ग्रामीण उपरुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. लासलगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. राजेंद्र घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर करीत आहेत.