नाशिक : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना, महसूल खात्याचे अधिकारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात जुंपून ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय केला जात असल्याचा घरचा अहेर चांदवड-देवळा मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ. राहुल अहेर यांनी पालकमंत्र्यांना दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या फेरनियोजनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलविली असता त्यात हा प्रकार घडला. आमदार अहेर यांनी पालकमंत्र्यांची क्षमा मागूनच विषयांतर करीत असल्याचे सांगत ग्रामीण भागातील दुष्काळसदृश परिस्थिती कथन केली. सारेच महसूल अधिकारी कुंभमेळ्याच्या कामात गुंतल्यामुळे ग्रामीण भागात चारा, पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली. चांदवड तालुक्यासाठी अवघे तीन आठवडे पुरेल इतका चारा असून, प्रशासन जर अजून महिनाभर कुंभमेळ्यातून बाहेर पडणार नसेल तर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तातडीने दुष्काळ आढावा बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली. परंतु आमदार अहेर यांच्या या मागणीला अन्य एकाही लोकप्रतिनिधीचे समर्थन मिळाले नाही. मात्र पालकमंत्र्यांनी या संदर्भात लवकरच बैठक घेण्याचे मान्य केले. (प्रतिनिधी)सिंहस्थ स्नानासाठी आरोग्य पथके तैनातनाशिक : इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे येत्या ६ सप्टेंबर रोजी शाही पर्वणीनिमित्त साधू-महंतांसह भाविकांचे शाहीस्नान होणार असून, या शाही पर्वणीनिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या असून, स्वाइन फ्लूपासून काळजी घेण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे. कावनई येथील शाही पर्वणीनिमित्त खंबाळे वाहनतळ, कपिलधारा वाहनतळ व श्रीक्षेत्र कावनई येथे तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहायक, परिचर, वाहनचालक व रुग्णवाहिका यांच्यामार्फत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)सध्या पाऊस कमी असल्याने तसेच, स्वाइन फ्लू या आजाराला पोषक असे वातावरण असल्याने नागरिकांनी पर्वणीस येताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
दुष्काळाकडेही लक्ष द्या!
By admin | Updated: September 3, 2015 23:27 IST