नाशिक : काळानुसार आई-बाबांची भूमिका बदलत असून, संयुक्त पालकत्वाची संकल्पना अजूनही रुजलेली दिसत नाही. म्हणूनच पालकत्व संवादी होण्यासाठी आई-बाबांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत शुभदा जोशी यांनी व्यक्त केले. बदलत्या युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी पालकांची मुलांप्रती जबाबदारी वाढली असल्याचे त्या म्हणाल्या. ‘जीवन उत्सव’ जीवनशैली सप्ताहात संवादी पालकत्व विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पालक म्हणजे आई हे समीकरण अजूनही बहुतांशी कायम आहे. शहरी भागात यात काही प्रमाणात लक्षणीय बदल होताना दिसतो आहे, परंतु समाजात संगोपन ही जबाबदारी प्रामुख्याने महिलांचीच मानली जात असून, यात बदल होणे गरजेचे आहे. आजच्या युगात तंत्रज्ञानाने सर्वांचे जग व्यापले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने फेसबुक, व्हॉट्स अॅप, टष्ट्वीटर वापरणाऱ्या पालकांची संख्याही वाढली आहे. परंतु, या साधनांमुळे मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घेण्याचे आवाहन जोशी यांनी यावेळी केले. त्यांच्या संकल्पना फलकावर मांडण्यासाठी अमृता ढगे यांनी साहाय्य केले.
पालकांची मुलांप्रती जबाबदारी वाढली
By admin | Updated: February 1, 2017 00:56 IST