सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी बालकांना घेऊन आलेल्या महिला व पालकांना सुमारे दोन तास ताटकळवल्याची तक्रार पालकांनी केली आहे. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्याच्या पहिल्या बुधवारी लहान बालकांना लसीकरण करण्यात येते. त्यासाठी दापूरसह परिसरातील धुळवड, चापडगाव येथील पालक बालकांना घेऊन आले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण सकाळी ७ वाजेपासूनच रुग्णालयाच्या आवारात येऊन थांबले होते. मात्र संततीच्या शस्त्रक्रिया असल्याचे कारण सांगून आलेल्यांना थांबून राहण्याचा सल्ला देण्यात आला. सकाळी १० वाजता अजून उशीर होईल असे कारण सांगून ज्यांना थांबायचे त्यांनी थांबा व उर्वरित जणांनी नंतर या असे सांगण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली. अनेक पालकांनी आपण सकाळी ७ वाजेपासून आल्याचे सांगितल्यानंतर काहींना लसीकरण करण्यात आले, तर गोवरची लस न सापडल्याने लाभार्थीस परत पाठवून दिल्याचे सांगण्यात येते. लसीकरणचा दिवस ठरलेला असताना रुग्णालय प्रशासनाकडून नियोजन असणे अपेक्षित होते.
लसीकरणासाठी पालक, बालकांना ताटकळवले तक्रार : दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:13 IST