नाशिक : महाराष्ट्रात चीनच्या धर्तीवर वर्षभर महिला बचतगटांच्या वस्तू विक्रीसाठी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विभागीय पातळीवर व जिल्हा पातळीवर सरकारी ‘मॉल’ उभारण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिकला महिला बचतगटांच्या विभागीय मेळाव्यासाठी त्या आल्या होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू गावपातळीवर विक्री होणे अशक्य आहे. त्यासाठी त्यांना चीनच्या धर्तीवर जसे वर्षभर प्रदर्शन भरविण्यात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही वर्षभर प्रदर्शन भरवून महिला बचतगटांच्या वस्तुंची विक्री करण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागीय व जिल्हा पातळीवर एक मॉल उभारण्यात येणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकीन पुरविण्यासाठी सरकार मदत करणार आहे. सॅनेटरी नॅपकीन तयार करण्यासाठी सरकार अनुदान देईल, तसेच काही कंपन्यांकडून सीएसआरच्या स्वरूपातही मदत घेऊन हे सॅनेटरी नॅपकीन ग्रामीण भागात शाळा-शाळांमध्ये महिला बचतगटांच्या माध्यमातून पुरविण्यात येईल. यासाठी महिला बचतगटांना या विक्रीतून जो नफा येईल, तो देण्यात येणार असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बचतगटांसाठी ‘मॉल’ उभारणार : पंकजा मुंडे
By admin | Updated: March 5, 2017 01:02 IST