नाशिक दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष निखिल पांचाल, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे आदींनी भेट घेऊन विविध समस्यांचे निवेदन दिले. त्यात प्रस्तावित सीईटीपी (सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) लवकर कार्यान्वित करावा, भूमिगत गटार योजना राबवावी, अंबड व सातपर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना छावा या राजकीय संघटनेकडून त्रास दिला जात आहे. याबाबत तातडीने पोलीस आयुक्तांना सूचना करून, संबंधितांवर कडक कारवाई करून समज देण्यात यावी. औदयोगिक क्षेत्रात सार्वजनिक शौचालये व प्रसाधनगृह उभारणीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा.
नाशिकमधील सारोळ या ठिकाणी प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी जागा आरक्षित करण्याच्या दृष्टीने शासकीय शिक्के मारलेले आहेत. अशा जागा त्वरित ताब्यात घेऊन उद्योगाकरिता उपलब्ध करून द्याव्यात. सिन्नर येथील इंडिया बुलच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने मार्ग काढावा. एमआयडीसीने बांधलेल्या फ्लॅटेड बिल्डिंगच्या गाळे विक्रीचे धोरण लवचिक करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आले. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश राजपूत, महाव्यवस्थापक संतोष गवळी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
इन्फो==
कोविडमुळे उद्योजकांच्या भेटीगाठी होऊ शकल्या नाहीत, तरीही उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिककडे विशेष लक्ष आहे. लवकरच नाशिक भेटीवर येणार असून, संपूर्ण दिवस उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, ज्या काही अडीअडचणी असतील, त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्याचे आयमाचे सरचिटणीस निखिल पांचाल यांनी सांगितले.
फोटो :- नाशिक भेटीवर आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन विविध समस्यांचे निवेदन देताना, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे समवेत निखिल पांचाल, ललित बुब, राजेंद्र अहिरे आदी.