नांदूरवैद्य -:लोहशिंगवे परिसरात बिबट्याची दहशत कायम असून गायीचे बछडे ठार केल्याने भितीचे वातावरण आहे. लोहशिंगवे शिवारातील जुंद्रे मळा परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून या बिबट्याने दोन दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात एक गाय ठार झाल्याच्या घटनेला दोन दिवस पुर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा याच परिसरात असलेल्या चौधरी मळ्यात राहणारे सुनिल चौधरी यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीच्या बछड्यावर राञी दोन वाजेच्या सुमारास हल्ला करून गायीचे एक बछडे फस्त केल्याची घटना शनिवारी लोहशिंगवे येथे घडली.सदर घटनेची माहिती सरपंच संतोष जुंद्रे यांनी वनविभागाला दिली. लोहशिंगवे येथील दोन दिवसांत बिबट्याने दोन हल्ले केल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.असे यावेळी येथील नागरिकांनी बोलून दाखवले.या परिसरात दि. २१ बुधवारी जुंद्रे मळ्यामध्ये राहणारे निवृत्ती जुंद्रे यांच्या शेतवस्तीवरील गोठ्याबाहेर बांधलेल्या गायींवर हल्ला करून गायीला ठार केले होते. सलग दोन दिवस बिबट्याने या वस्तीवर येत हल्ला केल्याचे सञ सुरु च ठेवल्याने नागरिकांनी वनविभागाला पिंजरा लावण्यात येवुन या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
लोहशिंगवे परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 14:38 IST