भऊर : येथील शेत शिवार - मळा वस्तीत बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी शेतीच्या कामांवर परिणाम झाला असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर व ग्रामपंचायतीकडून मागणी करण्यात येत आहे.येथील शेत शिवारातील कंसारा नाला, काकुळते वस्ती, पाळेकर वस्ती, मैल परिसर, भऊर फाटा, बोदाडी, नवादेव रस्ता आदि परिसरात १५ दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. रात्री, पहाटे रस्त्यांवर व शेतपिकांमध्ये बिबट्या दिसत असल्याने शेतकरीवर्ग व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. कामाअभावी ऐन दुष्काळात आर्थिक नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बिबट्याने परिसरातील जनावरांना फस्त केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नाही त्यामुळे परिसर निर्मनुष्य झाला आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना पाण्याची आवश्यकता असून, विजेच्या भारनियमामुळे रात्री-पहाटे वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून जावेच लागते. बिबट्याच्या दर्शनामुळे व भीतीमुळे विहिरींमध्ये अल्पप्रमाणात असलेले पाणी पिकांना देणे शेतकरीवर्गासाठी अशक्य होत आहे.ग्रामस्थ फटाके फोडून बिबट्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वनविभागाने या ठिकाणी त्वरित पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
भऊर परिसरात बिबट्याची दहशत
By admin | Updated: September 12, 2015 22:21 IST