निफाड : तालुक्यातील शिंगवे येथे गुरुवारी (दि. २४) पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बछडा अडकला असून, पिंजऱ्यातील बछड्याच्या डरकाळ्यांनी बिबट्याच्या मादीने पिंजरा लावलेल्या परिसरात दर्शन दिल्याने मादीला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने गुरुवारीच दुसरा पिंजरा लावला. शिंगवे येथील दीपाली कोठे (७) या बालिकेचा दि. ८ आॅगस्ट २०१५ रोजी बिबट्याने बळी घेतल्याने वनविभागाने शिंगवे येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांपूर्वी वनविभागाने शिंगवे येथील रामदास निवृत्ती रायते यांच्या शेतातील वस्तीजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. गुरुवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास बिबट्याचा आठ महिने वयाचा बछडा पिंजऱ्यात अडकला. सदर बाब रायते यांनी वनविभागाला कळवली. येवला वनविभागाने वनपरिमंडळ अधिकारी ए.टी. काळे, येवला वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी अनुक्रमे बी.आर. ढाकरे, एस.व्ही. सहाणे, वनरक्षक, सोनवणे, पगारे, दौंड हे तातडीने शिंगवे येथे आले. सदर बछडा पिंजऱ्यात अडकल्याने प्रचंड डरकाळ्या फोडत होता. बछड्याच्या डरकाळ्यांच्या आवाजाने बिबट्याची मादी सकाळी ८ च्या सुमारास सदर पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या उसाच्या क्षेत्रातून बाहेर आली होती. परंतु पिंजऱ्याजवळील नागरिकांची गर्दी पाहून ती उसात माघारी गेली. रात्रीच्या सुमारास सदर बिबट्याची मादी आपल्या बछड्याच्या आशेने येऊ शकते. या शक्यतेने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुपारी लगेच त्या बछडा अडकलेल्या पिंजऱ्याशेजारी दुसरा पिंजरा लावला. त्यानंतर वनविभागाने व पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही पिंजऱ्यापासून नागरिकांना हटवले.
घबराट : मादीचेही परिसरात दर्शन
By admin | Updated: September 24, 2015 22:58 IST