पाथर्डी फाटा : सोमवारीच जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्वत्र वन संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली; मात्र बुधवारी सकाळी अचानकपणे डोंगरमाथ्यावर धुराचे लोट उठत असल्याने डोंगरावरील वृक्षसंपदा धोक्यात आली. सकाळी लागलेली आग दुपारपर्यंत धुमसत होती. दुपारच्या दरम्यान वनविकास महामंडळाच्या वनमजुरांच्या सदर बाब जागरूक नागरिकांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी डोंगराच्या दिशेने धाव घेतली.पांडवलेणीच्या डोंगरावर काही हौशी भटकंती करणाऱ्या तरुणांपैकी काहींनी धूम्रपान केल्यामुळे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याचा संशय वनविकास महामंडळाने व्यक्त केला आहे. सकाळच्या सुमारास डोंगरमाथ्यावर आग लागली असली तरी याच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जवाहरलाल नेहरू वनोद्यानातील कर्मचाऱ्यांच्या सदर बाब निदर्शनास आली नाही, हे विशेष! सकाळपासून पेटलेले गवत दुपारपर्यंत धुमसत असल्याने डोंगरावरील पूर्वेच्या दिशेने असलेल्या जंगलामधील वृक्षसंपदेला आगीची झळ बसली. वाळलेले गवत पाळापाचोळा व वृक्षही या आगीत भस्मसात झाले. सुदैवाने आग वनोद्यानाच्या दिशेने पसरली नाही त्यामुळे अनर्थ टळला. एकीकडे सायकल ट्रॅक करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याला लागून असलेल्या वृक्षसंपदेवर सर्रासपणे जेसीबी चालवित वृक्षराजीचा ऱ्हास करण्यात आला तर दुसरीकडे अशा व्यसनाधिन तरुणांच्या निष्काळजीपणामुळे जंगलावर संकट ओढावल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वनोद्यानातील कर्मचाऱ्यांना सदर बाब नागरिकांनी लक्षात आणून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी डोंगरावर धाव घेत आग विझविली. (प्रतिनिधी)