नाशिक : कर्जाला कंटाळून निफाड तालुक्यातील पालखेड येथील शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी घडली आहे़ मयत शेतकऱ्याचे नाव शिवाजी शंकर काळे (६८) असे असून, या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़शनिवारी (दि़ ५) दुपारच्या सुमारास शिवाजी काळे यांनी घराचा दरवाजा बंद करून विषारी औषध सेवन केले़ सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी दरवाजा तोडून काळे यांना उपचारासाठी निफाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले़ रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच काळे यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. शिवाजी काळे यांचे गत दोन ते तीन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते़ तसेच त्यांच्यावर ओरिएंटल बँकेचे सुमारे आठ लाख रुपयांचे कर्ज होते़ शेतीतील नुकसानीमुळे कर्जाचे व्याज भरणेही त्यांना शक्य झाले नाही़ यामुळे हताश झालेल्या काळे यांनी ही भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले़ दोन दिवसांपूर्वीच कर्जाला कंटाळून जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)
पालखेडला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Updated: December 6, 2015 22:21 IST