लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रख्यात पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांच्या आठव्या ‘पक्षीगाथा’ ’ या पक्ष्यांवरील वैविध्यपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नाशिक पक्षी मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर जगताप ह्यांच्या हस्ते आणि पक्षीप्रेमी सतीश गोगटे व वैद्य विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
पक्षीगाथा या पक्ष्यांविषयीच्या आठव्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी रचना विद्यालयाच्या सभागृहात झाले. कोविडमुळे या पुस्तक प्रकाशनाला उशीर झाला, पण हे पुस्तक प्रकाशित होताना आनंद होत असल्याचे मत गाडगीळ यांनी मांडले. विविध पक्ष्यांना ओळखण्यासाठी सतत निरीक्षण करताना पक्ष्यांमध्ये काय पाहावे याचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या ४ महिन्यात नववे पुस्तक प्रकाशित होत असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले. पक्षीमित्र गाडगीळ यांनी पक्ष्यांवर प्रेम करून अनेकांना पक्षी निरीक्षणाची गोडी लावून त्यांचा अभ्यास करण्याची सवय लावली असल्याचे मधुकर जगताप यांनी सांगितले. गाडगीळ यांनी पक्षी निरीक्षण व अभ्यास करणाऱ्यांची पिढी तयार केली असून नाशिकमध्ये पक्षी केंद्राला नवीन आयाम मिळवून दिला आहे. पक्षीगाथा या पुस्तकातून पक्ष्यांविषयीची बारीकसारीक गोष्टींची माहिती दिली असून ती अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. यावेळी गाडगीळांनी पक्षी निरीक्षणाची व अभ्यासाची गोडी लावतानाच त्यातील बारीक गोष्टींचा अभ्यास करायला शिकवल्याचे पुस्तकासाठी विविध पक्ष्यांची छायाचित्र देणारे सतीश गोगटे यांनी सांगितले. महाराष्ट्र समाज सेवा संघाचे सहायक सचिव अहिरे यांनी गाडगीळांनी गत ३६ वर्षांत पक्ष्यांसाठी काम करताना अनेकांना वेगळ्या विश्वात नेल्याचे सांगून महाराष्ट्र सेवा संघासाठी त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. पुण्याच्या सोहम प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून नाशिकमध्ये याचे प्रकाशन झाल्याचा पक्षीप्रेमींना आनंद झाल्याचे वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. डॉ. राजू कसबे यांनी प्रास्ताविक केले.
फोटो - २८ पक्षीगाथा
पक्षीगाथा पुस्तक प्रकाशन प्रसंगी मधुकर जगताप. समवेत वैद्य विक्रांत जाधव, लेखक दिगंबर गाडगीळ आणि सतीश गोगटे.
.