पंचवटी : प्रभागात घंटागाडी येत नाही, ड्रेनेजची कामे होत नाहीत, औषधफवारणीचा तर विषयच नाही, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे अधिकारी दखल घेत नसतील आणि येत्या सहा महिन्यांत नागरिकांना त्रास झाला तर कोणते अधिकारी हप्ते घेतात याचे पितळ उघडे पाडण्याचा इशारा प्रभागाच्या बैठकीत नगरसेवक मनीषा हेकरे यांनी दिला. पंचवटी प्रभागाची बैठक सभापती रुचि कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांच्या १४ लाख रुपयांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. तासभर चाललेल्या या सभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. प्रभागात दहा दिवस घंटागाडी येत नाही, घंटागाडीची संख्या कमी तर दुसरीकडे एकाच प्रभागात पाच पाच घंटागाड्या कशा असे सांगून प्रशासन भेदभाव करीत असल्याचा आरोप नगरसेवक रंजना भानसी, गणेश चव्हाण यांनी केला. रामवाडी, कोशिरे मळा भागात रस्ते तयार केले असले तरी रस्त्यालगत बांधकाम साहित्य आणून टाकत असल्याने परिसर ‘डंपिंग’ ग्राऊंड बनले आहे. ड्रेनेज कामासाठी निधी आला तरी कामे होत नाही, असे हेकरे यांनी सांगितले. म्हसरूळ स्मशानभूमीत अंत्यविधीचे पुरेसे साहित्य मिळत नसल्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुठे पैसे खायचे याचा विचार करावा, असे चव्हाण यांनी सांगितले. प्रभाग सभापतींच्या प्रभागात घंटागाडी नियमित येत नसल्याचे कचरा साचून राहतो. आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यास कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची तक्रार सुनीता शिंदे यांनी केली. तर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने कोणती दखल घेतली, असे समाधान जाधव यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक प्रा. परशराम वाघेरे, रूपाली गावंड, शालिनी पवार, फुलवती बोडके, उद्धव निमसे आदिंसह विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, वसंत ढुमसे, राहुल खांदवे, आर. एम. शिंदे, संजय गोसावी आदिंनी सहभाग घेतला होता. (वार्ताहर)
...अन्यथा अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडणार
By admin | Updated: July 29, 2016 00:43 IST