नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करूनही सुमारे तीन लाख साधू-महंत येण्याची शक्यता असताना केवळ ३० हजार साधू आले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या शाही पर्वणीसाठी मात्र निश्चित जास्त साधू-महंत येतील, असा ठाम विश्वास अनेक साधू-महंतांनी यासंबंधी माहिती देताना व्यक्त केला. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर भाविकांची संख्यादेखील वाढेल, असेही त्यांनी सांगितले.उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा सण आटोपल्यावर सिंहस्थासाठी निश्चितच भाविक तसेच साधू येतील, असेही त्यांनी सांगितले. अखिल भारतीय श्री पंच रामानंद निर्मोही आखाड्याचे महंत परमात्मादास महाराज म्हणाले की, पहिले शाहीस्नान आणि दुसरे शाहीस्नान यात दोन आठवड्याचे अंतर आहे. याउलट दुसऱ्या व तिसऱ्या शाहीस्नानात फक्त चार दिवसांचे अंतर असल्याने साधू व भाविक लोक दुसरे आणि तिसरे शाहीस्नान करूनच जातील. काही पहिल्या शाहीस्नानासाठी आलेले साधू आणि भाविक आता जन्माष्टमीसाठी आपापल्या मंदिर, मठात तसेच मूळ गावी गेले आहेत. त्यांच्यासोबत परत आता खूप लोक येतील, तर अखिल भारतीय श्री पंच निर्माेही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास म्हणाले की, प्रशासनाने सुविधा खूपच चांगली ठेवली आहे, परंतु भाविकांना सक्तीच्या बंदीचा त्रास झाला. दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीला बॅरिकेडिंगचे अंतर थोडे कमी करून शिथिलता केली, तर गर्दीचा महापूर येईल. सध्याही साधू-महंत मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत; परंतु साधुग्रामचा विस्तार मागील सिंहस्थापेक्षा मोठा असल्याने एकाच ठिकाणी गर्दी जाणवत नाही. घाटदेखील खूप आहेत. त्यामुळे गर्दी ही कधीही दिवसेंदिवस वाढत असते, कमी होत नसते, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दुसऱ्या शाहीस्नानासाठी निश्चित जास्त साधू-भाविक येतील
By admin | Updated: September 4, 2015 00:39 IST