नाशिक : शहरातील सायकलिस्ट महिलांनी आज एकत्र येत आगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. सकाळच्या सुमारास सर्व सायकलप्रेमी महिला, युवतींनी शहरातून सायकल रॅली काढत आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सायकल चालविण्याला प्राधान्य द्या, असा संदेश दिला आहे.जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातून सायकल रॅलीचे आयोजन केले होते. सुदृढ शरीर व निरामय आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा म्हणून शहरातील विविध भागांमध्ये दररोज शेकडो महिला, पुरुष सायकलिंग करतात. या पार्श्वभूमीवर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहभागासाठी शहरातील सर्व सायकलप्रेमी महिलांना संस्थेच्या वतीने सोशल नेटवर्किंगच्या व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अध्यक्ष विशाल उगले यांनी आवाहन केले होते. सुमारे बारा किलोमीटरच्या या रॅलीला गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी आठ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी सायकलिस्ट महाराष्ट्र पोलीस अकादमीचे उपसंचालक हरिष बैजल, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, विशाल उगले यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या रॅलीमध्य विविध वयोगटांतील सुमारे शंभर महिलांनी सहभाग नोंदविला. रॅली त्र्यंबकरोडने, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड मार्गे जेहान सर्कल, गंगापूररोड, पंडित कॉलनी, शरणपूररोडवरून राजीव गांधी भवन मार्गे गोल्फ क्लब येथे साडेनऊ वाजेच्या सुमारास पोहचली. संस्थेच्या वतीने भाग्यवंत सोडत काढण्यात आली. पाच विजेत्यांना प्रवासी बॅग भेट म्हणून देण्यात आली. डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. श्वेता भिडे, प्रिया अहेर, यामिनी खैरनार, अपूर्वा रौंदळ, दीप्ती जाधव, वैशाली शेलार, हिताक्षी जोशी यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
शहरातून सायकल रॅलीचे आयोजन
By admin | Updated: March 9, 2015 01:33 IST