नाशिक : पेंटिंग, मूर्ती व चित्रांचे बहुचर्चित अशा श्लोक प्रदर्शनाचे सप्टेंबरमध्ये आयोजन केले आहे. ८ जूनपासून प्रदर्शनातील प्रवेश सुरू असून, २० जुलै २०१४ पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक विभागातील कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी असून, कलाकारांची तीन गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. त्यात पेंटिंंग, मूर्ती, ग्राफिक्स व प्रिंंट यांचा समावेश असेल. या प्रदर्शनात कलाकारांना दोन्ही गटांत पुरस्कार, मोबदला व प्रावीण्य प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी कलाकाराला आपल्या पेंटिंंगच्या छायाचित्रामागे महाविद्यालयाच्या ओळखपत्राची अॅटेस्टेड केलेली छायाप्रत लावावी लागेल. या प्रदर्शनात सहभागी होणारे व्यावसायिक व इतर कलाकार पदवीधर असावेत, तसेच कलाकाराचे ३-४ सोलो एक्झिबिशन किंंवा ग्रुप एक्झिबिशन झालेले असावेत. फोटो प्रवेशाच्या वेळी कलाकाराने आपला बायोडाटा सोबत द्यावा. प्रवेशासाठी ८ बाय १० इंचेस आकाराच्या पेंटिंगचे छायाचित्र सादर करावे लागेल. जमा केलेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. प्रत्येक कलाकार चार पेंटिंग्ज पाठवू शकेल. स्पर्धकांनी छायाचित्रे लोकमत शहर कार्यालय, सुयोजित ट्रेड सेंटर, राजीव गांधी भवनसमोर, शरणपूर रस्ता, नाशिक या पत्त्यावर पाठवावी. विद्यार्थी कलाकारांना प्रतिपेंटिंगसाठी १५० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. व्यावसायिक व इतर कलाकारांकडून प्रतिपेंटिंग ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कोणत्याही कारणाने भरलेली फी परत केली जाणार नाही. सर्व पेंटिंगच्या मागे कलाकाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, पेंटिंगचे शीर्षक, माध्यम, आकार, मूल्य इत्यादी तपशील असावा. प्रदर्शनासाठी पाठवावयाच्या चित्राच्या कॅन्व्हासचे आकारमान १० वर्गफूट निश्चित करण्यात आले असून, फ्रेमची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कलाकारांचीच राहील. माउंट बोर्डवरील पेंटिंग स्वीकारल्या जाणार नाहीत.प्रदर्शनासाठी निवड झालेली वॉटर कलर व चारकोलने रेखाटलेली चित्रे अॅक्रॅलिक काचेच्या फ्रेममध्ये असावीत. प्रदर्शनात पेंटिंग व इतर कलाकृतींची विक्री होऊ शकेल. यासंदर्भात अंतिम निर्णय आयोजन पथकाकडे राहील. या प्रदर्शनामुळे सर्व कलाकारांना एक व्यासपीठ मिळणार आहे. या प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी ९९२१०३०७००, ९९२२९५५३०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
श्लोक प्रदर्शनाचे सप्टेंबरमध्ये आयोजन
By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST