वणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणातून यापुढे पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाने ग्रामपालिकेला जलमापक यंत्र म्हणजेच पाणी मोजणीसाठीचे मीटर बसविण्यासाठी दिलेल्या लेखी पत्रानुसार ग्रामपालिकेने सूचना-पूर्तीसाठी हालचाली सुरू केल्याने ग्रामपालिकेला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. वणीची अधिकृत लोकसंख्या सतरा हजारांच्या जवळपास आहे. मात्र यापेक्षा अधिक लोक वास्तव्यास असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, सुमारे १५०० नळजोडणी धारक आहेत. त्यात घरगुती व व्यावसायिक नळधारकांचा समावेश आहे. जोडणीधारकांना ओझरखेतून ग्रामपालिकेच्या माध्यमातून पाणी वितरण करण्यात येते. उपविभागीय अभियंत्यांनी सदर प्रत कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनाही पाठविली आहे. पाणीपुरवठा खंडित होऊ नये याकरिता पाटबंधारेची सूचना अमलात आणण्यासाठी २६ अटी व शर्तींशी बांधील राहून करारनामा करून मीटर बसविण्यासाठी हालचाली केल्या आहेत. मीटर बसविल्यानंतर प्रतिदिन ग्राम पालिकेने धरणातून पाण्याची नोंद होणार आहे. त्या गणितानुसार पाटबंधारे विभागाच्या नियमांना अनुसरून आकारणी करण्यात येणार आहे. वर्तमान आकारणीपेक्षा निश्चितच ही अधिक असणार आहे. याचा भुर्दंड ग्रामपालिकेला बसणार आहे. (वार्ताहर)
ओझरखेड धरण येथे जलमापक यंत्र बसविण्याचे आदेशं
By admin | Updated: March 9, 2016 22:43 IST