नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पालिकेच्या वाट्याला आलेल्या आरक्षणाच्या तुलनेत केवळ २१० दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक असून, ते जुलैपर्यंत पुरेल. तथापि, उर्वरित धरणातील उपलब्ध पाणीदेखील पिण्यासाठी पालिकेला मिळेल, असे पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात चार हजार दशलक्ष घनफूट इतके पालिकेला पाणी आरक्षण आहे. पालिकेला दररोज सुमारे १६ दशलक्ष घनफूट पाणी लागते. पाटबंधारे खात्यामार्फत पालिकेला नऊ महिन्यांसाठी पाणी आरक्षण दिले जाते. चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणात साठा दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्यासाठीच ७ जुलैपासून चार विभागांत एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे दररोज चारशे दशलक्ष लिटर्सचा पाणी उपसा करणारी महापालिका सध्या साडेतीनशे दशलक्ष लिटर्सचा पाणी उपसा करीत आहे. मनपाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर धरणात पालिकेला चार हजार दशलक्ष घनफूट आरक्षण देण्यात आले होते. त्यापैकी ३१ जुलैपर्यंत २१० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. अर्थात, त्यानंतर पाणीपुरवठा होणार नाही असे नाही, तर धरणात असलेले पाणी वापरात येईल, कारण शासनाच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्यालाच सर्वाेच्च प्राधान्य असल्याने पालिकेला पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)