नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभागाने खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांना नोंदणीसाठी दिलेली मुदत शनिवारी (दि. ३०) संपुष्टात आली असून, या मुदतीत जिल्हाभरातून केवळ २३९ शाळांनी नोंदणी केली आहे. गतवर्षात ४४८ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातुलनेत यावर्षी अल्प प्रतिसाद मिळाल्याने शाळा नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरटीई प्रवेशासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २३९ शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या शाळांमध्ये २५ टक्के राखील कोट्यातून २,१३३ जागा आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ४४८ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातील ४४७ शाळांमध्ये ५,३०७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. गतवर्षात कोरोनामुळे अनेक शाळांमध्ये राखीव जागा रिक्त राहिल्या. त्याचप्रमाणे आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीही वेळेत मिळत नसल्याने, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शाळा नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यापर्यंतच शाळांची नोंदणी झाली असून, शाळांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शाळांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता शिक्षण विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
इन्फो
आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
९ ते २६ फेब्रुवारी : ऑनलाईन प्रवेश अर्ज
५ ते ६ मार्च : ऑनलाईन सोडत
९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चित करणे.