लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर व परिसरात खासगी अनुदानित विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहाय्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्पर्धा सुरू झाली असून, विविध शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासन विभाग व्हॉटसॲॅप, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांसह ओळखीच्या पालकांना फोन कॉल करून त्यांच्या पाल्याचा आपल्या शाळेत प्रवेश निश्चित करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारे शहरातील विविध शाळांमध्ये ऑनलािन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असून, त्यासाठी बहुतांश शाळांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे.
नाशिक महापालिकेच्या शहरात एकूण ९० शाळा असून, अनुदानित ८१ शाळा आहेत, तर खासगी विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहाय्य शाळा मिळून हा आकडा जवळपास २७५ पर्यंत आहे. यातील खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये मे महिन्यात निकाल जाहीर होताच पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाते. परंतु, गत वर्षापासून वर्षी कोरोनामुळे शाळा महाविद्यायांसाठी निर्बंध असून, हे निर्बंध या वर्षीही आणखी काहीकाळ वाढण्याचे संकेत असल्याने संबंधित शाळांनी या समस्येवर उपाय म्हणून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासन विभागाला व्हॉटसअप, फेसबुक सारख्या सोशल मध्यमांसह ओळखीच्या पालकांना फोन कॉल करून त्यांच्या पाल्याचा आपल्या शाळेत प्रवेश निश्चित करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
इन्फो
पालकांना फोन कॉल
अनेक शाळांकडून मागील वर्षी प्रवेशासाठी शाळेत संपर्क करणाऱ्या पालकांना फोन कॉल करून त्यांच्या पाल्यासाठी प्रवेशाची गळ घातली जात आहे. विशेष म्हणजे गतवर्षी डोनेशनची मोठी रक्कम मागणाऱ्या बहुतांशी शाळा यावर्षी केवळ शैक्षणिक शुल्कात प्रवेश देण्यात तयार होत असल्याने पालकांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.