वाढती महागाई व ज्याच्यावर शेती उत्पादन अवलंबून आहे, त्या खतांच्या किमती आणि उत्पन्न
यांचे गणित आता न जुळणारे झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जसे थैमान घातले आहे, त्याचप्रमाणे महागाईने देखील सामान्य गरीब, हातावर पोट असणाऱ्या असंघटित कामगारांचे हाल केले आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांनाही या महागाईची झळ पोहोचू लागली आहे. घरात पेटणाऱ्या चुलीपासून ते शेताच्या बांधापर्यंत हा जगण्याचा संघर्ष महागाईने अधिक बिकट केला आहे. रोजच्या फोडणीसाठी लागणारे गोडेतेल पाहता पाहता दोनशेच्या निकट येऊन पोहोचले. गोडेतेलाचा दर १८० ते १९० रुपये प्रतिकिलो आहे. शंभर टक्के शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांकडे उसाचे व दूध बिलाचे येणारे पैसे हाच आधार असतो. याच उसासाठी कष्ट घेऊन १५ ते १६ महिन्यांनंतर आलेल्या पैशातून एक टन उसाचे पैसे केवळ एक तेल डबा घेण्यासाठी लागत आहेत. सध्या गोडेतेल डब्याची किंमत २५०० ते २७०० रुपये इतकी आहे. त्यामुळे अनेकांना हात आखडता घेणे भाग पडले आहे.
इन्फो
ऊस ३ रुपये किलो, खत ३० रुपये किलो
भरमसाट भाव वाढलेली खते व औषधी
देखील बळीराजाला मिळालेला पैसा वेगाने खेचून नेत आहेत. ज्या उसाला प्रतिकिलोस दर अडीच ते तीन रुपये मिळतो त्याच उसासाठी खत प्रतिकिलोला २८ ते ३४ रुपये देऊन खरेदी करावे लागते आहे. शिवाय अन्य घरखर्च, मशागत खर्च, मुलांचे शिक्षण, लग्न हे खर्च देखील कृषी उत्पन्नातून करावे लागतात. त्यामुळे तर बळीराजाच्या जगण्याची वाट अजून बिकट होत आहे.