सुरगाणा : येथून जवळच असलेल्या चिराई घाटात मारुती अल्टोकारला अपघात होऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान सदर घटना घडली. या अपघातात एक जण जखमी झाला, तर सुदैवाने अडीच वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला.सुरगाणा येथील योगेश हरिभाऊ पगारे (२५) हा युवक नाशिक येथे छत्र्यांची खरेदी करण्यासाठी गेला होता. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान सर्व खरेदी आटोपून योगेश पवार हा त्याचा अडीच वर्षाचा मुलगा स्वामी व येथीलच ज्ञानेश्वर मोतीराम बिरारी असे तिघे जण स्वत:च्या अल्टो मारुती कारने (एमएच ०४ सीटी ५४७१) सुरगाण्याकडे येत होते. यावेळी योगेश स्वत: कार चालवित होता. रात्री ११ वाजेच्या दरम्यान चिराई घाट उतरत असताना गणपती (पोत्या देव) मंदिराच्या काँक्रीटच्या ओट्याला अल्टोची जोरदार घडक बसली. त्यात योगेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेले ज्ञानेश्वर बिरारी यांच्या पायाला जबर मार बसून जखमी झाले, तर सुदैवाने अडीच वर्षाचा मुलगा स्वामी हा सुखरूप बचावला. अपघाताची माहिती मिळताच मित्र परिवार व ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. योगेशला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मनमिळावू असलेल्या योगेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. (वार्ताहर)
चिराई घाटात कार अपघातात एक ठार
By admin | Updated: June 21, 2014 01:05 IST