सुरगाणा : बोरगाव - सापुतारा महामार्गावरील ठाणापाडा शिवारात स्विफ्ट कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. स्विफ्ट कार (क्र. एमएच २० सीएस ३४५५) सापुताऱ्याकडून नाशिककडे जात होती, तर ठाणापाडा, ता. सुरगाणा येथील संदीप बाळू पगार (४०) व संतोष फुलसिंग सूरभय्या (वय ३६, रा. औरंगाबाद) हे दोघेही दुचाकीवरून ठाणापाड्याकडून सापुताऱ्याकडे जात होते. ठाणापाडा शिवारातील वनविभागाच्या कमानीजवळ दोन्ही वाहनांत समोरासमोर धडक झाली. जबर अपघात झाल्यामुळे दुचाकीवरील संतोष सूरभय्या हा जागीच ठार झाला, तर संदीप पगार हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संदीप पगार यांचे ठाणापाडा येथे महामार्गालगत हॉटेल असून, संतोष हा हॉटेलमध्ये कामाला होता. स्विफ्ट कारचालक संतोष प्रकाश तांबे, रा. औरंगाबाद) यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)